महाराष्ट्रामध्ये मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेप्रमाणेच आता पोलिस यंत्रणा देखील थकली आहे. दरम्यान 31 मे पर्यंत भारतात वाढवलेला कोरोना व्हायरस लॉकडाऊन आणि अवघ्या 7-8 दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. आता त्यानुसार महाराष्ट्रामध्ये CISF आणि CRPF च्या तुकड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये CISF आणि CRPF च्या 5 टीम दाखल झाल्या आहेत. मुंबई शहरामध्ये झोन 1 ( कुलाबा ते मरीन ड्राईव्ह), झोन 3 ( ताडदेव, नागपाडा, वरळी ते एन एम जोशी मार्ग ), झोन 5, (धारावी ते दादर ) झोन 6 ( चेंबूर ते मानखुर्द ) आणि झोन 9 वांद्रे ते आंबोळी / अंधेरी पश्चिम )मध्ये या तुकड्या दाखल केल्या जातील अशी माहिती मुंबई विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद ही शहरं सध्या रेड झोनमध्ये आहेत. या ठिकाणी कंटेन्मेंट झोनची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीला आता हे अधिकचं सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील. तसेच शहरात काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन होते आहे का? याकडेही ते लक्ष ठेवून असतील. Coronavirus: मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना संक्रमित झालेले 87 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात.
महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सुमारे 1200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी मुंबईत 600 जणांचा समावेश आहे. तर 12 जणांनी जीव देखील गमावला आहे. कोरोना व्हायरसचा धोका पाहता महाराष्ट्र पोलिस दलाने 50 पेक्षा अधिक वर्षाच्या पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्ताच्या ड्युटीपासून लांब ठेवत घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सहाजिकच पोलिस यंत्रणा अपुरी पडत आहे. अशातच सलग 2 महिने काम केल्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यांना काही काळ आराम देऊन पुन्हा कामावर रूजू करण्यासाठी आता केंद्राचे सुरक्षा दल अधिकारी महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करतील.
पुणे शहरात काही दिवसांपूर्वीच रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. त्यासोबतच नाशिक, अमरावती, औरंगाबाद मध्येही तुकड्या तैनात आहेत.