COVID-19 Vaccination | (Photo Credit: Twitter/ANI)

राज्यात सध्या कोविड-19 (Coronavirus) प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाही सरकारने राज्यभरात शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आता, बीएमसीने (BMC) 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना लस (Vaccine) देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे खासगी शाळांमध्ये मोफत लसीकरण शिबिरे राबविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बीएमसी संचालित शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत 12 ते 14 वयोगटातील 3 लाख 95 हजार विद्यार्थी आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कॉर्बेवॅक्स ही लस मुलांना दिली जात आहे. सुरुवातीला अनेक पालकांनी लसीकरणात रस दाखवला होता, पण नंतर लसीकरणाची संख्या कमी होऊ लागली. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, बरीच मुले मुंबईबाहेर होती किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर गेली होती, त्यामुळे लसीकरण कमी झाले असावे. आता विद्यार्थी पुन्हा शाळेत जाऊ लागले आहेत आणि त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी शाळांमध्ये लसीकरण केले जाईल. बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते 1 जुलैनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी म्हणाले, ‘लसीकरणासाठी शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांशी आमची चर्चा सुरू आहे. त्यानंतर लसीकरण शिबिरांचे आयोजन केले जाईल.’ 26 जानेवारी 2021 पासून, बीएमसीने बीकेसी जंबो कोविड केंद्रात लसीकरण सुरू केले आहे. आजपर्यंत 18 वर्षांवरील 2,13,29,876 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. बीएमसीने 18 वर्षांवरील लोकसंख्येचे जवळपास 100 टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. (हेही वाचा: राज्यात आज BA.5 च्या 17 आणि BA.4 च्या 6 रुग्णांची नोंद; सध्या कोरोनाच्या 24,333 रुग्णांवर उपचार सुरु)

दरम्यान, आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 840 रुग्णांची नोंद झाली असून, 2051 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 10,72,953 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 12,043 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्ण दुप्पट होण्याचा काल 400 दिवस झाला आहे.