AC Local Train (Photo Credits: ANI)

मुंबईची (Mumbai) लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मुंबईच्या एसी लोकलबाबत (Mumbai AC Local) लवकरच एक मोठी भेट मिळू शकते. एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणे आणखी स्वस्त होणार आहे. मुंबईतील एसी लोकलच्या सिंगल प्रवासाचे भाडे कमी करावे, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने दिला आहे. मुंबईत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या भाड्याच्या आधारे हे भाडे निश्चित करण्यात यावे, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. मनी कंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. अशा परिस्थितीत भाडे कमी करण्यासोबतच रेल्वेला एसी लोकलची संख्या आणि फेऱ्याही वाढवाव्या लागतील.

एसी लोकल ट्रेन्सची संख्या कमी असल्याने लोक खूप कमी एसी मासिक पास काढतात. त्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. आता रेल्वे बोर्डाचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईकरांना एसीमध्ये प्रवास करण्यासाठी अवघे 10 ते 80 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच भाड्यात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. मात्र या प्रस्तावात सीझन तिकिटांच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी 65 रुपयांपासून 220 रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत आहे. (हेही वाचा: Non Agricultura Tax: मुंबई उपनगरातील रहिवाशांना मोठा दिलासा; अकृषी कराच्या वसुलीला सरकारकडून स्थगिती घोषित)

एसी लोकल प्रवास दराची यादी-

5 किमी - सध्या 65 रुपये आहे, मंडळाने 10 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

10 किमी - सध्या 65 रुपये आहे, मंडळाने 20 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

15 किमी - सध्या 90 रुपये आहे, मंडळाने 30 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

20 किमी - सध्या 135 रुपये आहे, मंडळाने 40 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

25 किमी - सध्या 135 रुपये आहे, मंडळाने 50 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

30 किमी - सध्या 175 रुपये आहे, मंडळाने 60 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

35 किमी - सध्या 180 रुपये आहे, मंडळाने 70 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

40 किमी - सध्या ते 190 रुपये आहे, मंडळाने 80 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

55 किमी - सध्या 205 रुपये आहे, मंडळाने 80 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

65 किमी - सध्या 220 रुपये आहे, मंडळाने 80 रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे

मुंबई रेल्वे विकास महामंडळ लवकरच 238 एसी गाड्यांसाठी निविदा काढणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे गर्दीच्या आणि नॉन-पिक अवर्समध्ये एसी ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या वाढेल, असे रेल्वे बोर्डाचे म्हणणे आहे.