मुंबई: कुर्ला स्थानकाजवळ मध्य आणि हार्बर मार्गाच्या लोकलवर दगडफेक, पाच जण जखमी; स्थनिक टोळ्यांवर संशय
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

तुंडुंब गर्दी, अनियमित लोकलच्या वेळा यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या मुंबईकर प्रवाशाच्या त्रासात भर टाकण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून लोकलवर दगडफेक केल्याच्या घटना समोर येत आहेत. काल, म्हणजेच मंगळवारी 16 जुलैला सुद्धा कुर्ला (Kurla)-विद्याविहार (Vidyavihar), कुर्ला-शीव (Sion) आणि कुर्ला-टिळकनगर (Tilaknagar) स्थानकांदरम्यान लोकलवर झालेल्या दगडफेकीमुळे एकाच दिवसात तब्बल पाच प्रवासी जखमी झाले आहेत. रतनदीप चंदनशिवे, हरिशंकर कहार, तौसिफ खान आणि राजेश पवार अशी जखमींची नावे असून या घटनेत एका कॉलेजला जाणाऱ्या राजेश याचा डोळा थोडक्यात वाचला आहे. मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली; विठ्ठलवाडी ते कल्याण स्थानकादरम्यान तांत्रिक दोष

या संदर्भात, कुर्ला स्थानकातील रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथे राहणाऱ्या राजेशने कॉलेजमधून घरी जाताना दादरहून खोपोली जलद लोकल पकडली.गर्दी असल्याने तो दाराजवळच उभा होता. कुर्ला-विद्याविहार दरम्यान गॅमन पूलाजवळ अज्ञात इसमाने लोकलवर दगड फेकला. दगड डोळ्यावर लागल्यामुळे राजेश धावत्या लोकलमधून रेल्वे रुळांवर पडला. या घटनेची माहिती प्रवाशांनी घाटकोपर पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी राजेशला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले.

यापाठोपाठ लगेचच कुर्ला-टिळकनगर मार्गावर धीम्या लोकलने प्रवास करत असताना तौसिफ खान तर विद्याविहार-कुर्ला-सायन मार्गावर रतनदीप चंदनशिवे आणि हरिशंकर कहार हे जखमी झाल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, मध्य रेल्वेने मागील पाच महिन्यात प्रकर्षाने समोर येणाऱ्या घटना पाहता, कांजूरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर आणि घाटकोपर-विक्रोळी परिसरात 16 आरपीएफ कर्मचाऱ्यांची गस्तीसाठी नियुक्ती केली आहे . दगडफेक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी घाटकोपर-विक्रोळी दरम्यान सीसीटीव्ही देखील उभारण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. याबाबत स्थानिक टोळ्यांवर रेलेवं पोलिसांना संशय आहे या टोळ्या रेल्वे रुळाच्या लगत असणाऱ्या पुलंचा व झाडाझुडुपांचा आडोसा घेऊन हे विकृत कार्य करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.