Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एका शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने आत्महत्या (Son Of Shiv Sena Corporator Commits Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील चेंबूर (Chembur) परिसरात रविवारी रात्री 9च्या सुमारास घडली आहे. या घटनेने संपूर्ण चेंबूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिषेक श्रीकांत शेट्ये असे आत्महत्या केलेल्या नगरसेवकाच्या मुलाचे नाव आहे. श्रीकांत शेट्ये हे चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग 155 चे नगरसेवक आहेत.

चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत अभिषेक शेट्ये राहत होता. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. परंतु, बराच वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याचा भाऊ अभिषेकला खोलीत बघायला गेला. तेव्हा अभिषेक पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसला. त्यानंतर त्याला तात्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले. अभिषेकने आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. हे देखील वाचा- बीड: टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; एकाला अटक

रविवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आपल्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे, अशी महिती समोर आली आहे.