प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

मुंबईत पावसाळा सुरू झाला की जुन्या इमारतीचे भाग कोसळून दुर्घटना होण्याच्या बातम्या आदळतात. यामध्ये जीवितहानी रोखण्यासाठी प्रशासन नागरिकांना वेळोवेळी धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देत असतात. यंदाही या यादीमध्ये 15 इमारतींचा समावेश आहे. पावसापूर्वीच त्या रिकाम्या होणं अपेक्षित असतं. 424 निवासींपैकी155 जणांनी यंदा स्वतः पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरितांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. त्यानुसार, या रहिवाशांवर निष्कासनाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ही नोटीस मिळताच काही रहिवाशांनी घरे रिकामी केली. मात्र अजूनही 197 रहिवासी अतिधोकादायक इमारतीत राहत असल्याचं समोर आलं आहे. हे रहिवासी घर रिकामे करण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.

मुंबई मध्ये 15 अतिधोकादायक इमारतींपैकी 6 इमारती रिकाम्या झाल्या आहेत. त्यापैकी 2 इमारती पाडण्याचं काम देखील पूर्ण झाले आहे. दरम्यान इमारती रिकाम्या झाल्यानंतर तात्काळ त्यांचे पाडकाम हाती घेण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना सांगितलं आहे. Mumbai MHADA House: मुंबई येथील दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू परिसरातील म्हाडाच्या 83 हजार घरांसाठी सोडत; घ्या जाणून .

महाराष्ट्रासह मुंबई मध्ये पावसाचा जोर सध्या वाढत आहे. जुलै महिन्यात तो अधिक तीव्र होण्याचा आयएमडीचा इशारा आहे. अशा परिस्थितीमध्ये या इमारतींचा धोकादेखील वाढत आहे. परिणामी या धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांकडून घरे रिकामी करून घेण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली आहे.

पाहा धोकादायक इमारतींची यादी

  1.  इमारत क्रमांक 4-4 ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
  2.  इमारत क्रमांक 74 निझाम स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
  3.  इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
  4. इमारत क्रमांक 61-61 ए , मस्जिद स्ट्रीट
  5. इमारत क्रमांक 212 जे पांजरपोळ लेन
  6. इमारत क्रमांक 173-175-179 व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
  7. इमारत क्रमांक 2-4-6 नानुभाई देसाई रोड,  मुंबई
  8. इमारत क्रमांक 1-23  नानुभाई देसाई रोड, मुंबई
  9. इमारत क्रमांक 351 ए, जे एस एस रोड मुंबई
  10. इमारत क्रमांक 387-391 बदामवाडी, व्ही .पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
  11. इमारत क्रमांक 17 नारायण निवास , निकटवाडी
  12. इमारत क्रमांक 31 सी व 33 ए ,आर रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग , गिरगावचौपाटी  ( मागील वर्षीच्या यादीतील)
  13. इमारत क्रमांक 104-106 ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग ( मागील वर्षीच्या यादीतील)
  14. इमारत क्रमांक 40 कामाठीपुरा 4थी गल्ली
  15. अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस - 3 विभाग, इमारत क्रमांक40 बी व 428, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ ( मागील वर्षीच्या यादीतील)

इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे आढळून आल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जेणे करून जीवित आणि वित्तहानी टाळता येईल, असे देखील मंडळातर्फे सांगण्यात येत आहे.