शिवशाही बस (Photo Credit: Facebook)

एस. टी. (ST) महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. हे नवीन दर 13 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहेत. शिवशाही बसच्या भाडेदरात सुमारे 230 ते 505 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसंच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा, यासाठी दरकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. (एसटी महामंडळाच्या मेगा भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी शिथिल झाले नियम, प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ 15 फेब्रुवारीपर्यंत)

शिवशाहीच्या एसी स्लीपर बस तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव एस. टी महामंडळाने राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. त्याच्या मंजूरीनंतर हा दरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एस.टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध 42 मार्गांवर वातानुकूलित शिवशाही बससेवा सुरु आहे. मागणीनुसार नवीन मार्गावरही बसेस सुरु करण्याची शक्यता आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात 30% सवलत देण्यात आली होती. त्यामुळे आता केलेल्या तिकीट दरकपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे. तसंच शिवशाही बसमध्ये लवकरच दिव्यांगानाही तिकीट दरात 70% सवलत देण्यात येणार आहे.