Electricity Tariff Changes (Photo Credits: Pixabay)

लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बील धाडल्याने अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सरकारकडूनही वीज दरात सूट देईल जाईल अशी माहिती देण्यात आली होती मात्र राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरल्यानंतर आता ज्या ग्राहकांनी वीजेची बिलं भरली नाहीत त्यांच्याविरोधात वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरू झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, नागपूर मध्ये महावितरणाकडून (MSEDCL) मागील 4 दिवसांमध्ये 1616 ग्राहकांची वीज कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतने त्यांच्या वृत्तामध्ये दिली आहे. या ग्राहकांवर 3 कोटी पेक्षा अधिकचे वीज बील थकीत असल्याचे सांगितले गेले आहे.

महावितरणाच्या आर्थिक संकटाचा विचार करता नागरिकांनी तात्काळ वीजेची थकीत बीलं भरावी. एकरकमी बील भरणं शक्य नसेल तर हप्त्यांच्या योजनेचा विचार करून बीलं भरा असे देखील सांगण्यात आले आहे. परंतू 1 एप्रिल 2020 पासून कोणतेच वीज बील न भरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांना 3 आठवड्यात वीज बिल न भराल्यास वीजपुरवठा खंडीत केला जाईल असं सांगण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये 14,29,811 ग्राहकांनी बील भरलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील वीज बिल न भरणाऱ्या तब्बल 14 लाखांहून अधिक ग्राहकांना झटका; विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा महाविरणाचा इशारा.

दरम्यान राज्यात मनसे आणि भाजपाकडून वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन, मोर्चे काढण्यात आले होते. यामध्ये मनसे कडून नागरिकांनी वीज बील न भरण्याचं देखील आवाहन केलं होतं. तर काही दिवसांपूर्वी राज्याच्या उर्जा मंत्र्यांनी वीज दरात कपात केली जाणार असल्याचं सांगूनही ते दर कायम ठेवल्याने विविध जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांनी उर्जामंत्री सह वीज कंपन्यांविरोधात फसवणूकीची तक्रार नोंदवली आहे.