प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील कसारा घाट (Kasara Ghat) भागात एका 24 वर्षीय तरूणाचा मृतदेह सडलेला अवस्थेत आढळून आला होता. अवघ्या चार तासात कसारा पोलिसांनी हत्येचा तपास केला आहे. तीश हा सतत पैशाची मागणी करून घरात त्रास द्यायचा. याच त्रासाला वैतागून सतीशची आई मायाबाई आगळे यांनीच त्याची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी मृतदेह कसारा घाटात टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबूली दिली आहे. मायाबाई यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा शिवाजी आगळे आणि भाचा अमृत जंगा बिरारे यांनाही अटक करण्यात आली आहे.

सतीश हा बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन होते. घरात दारू पिऊन आल्यानंतर तो शिव्या देत पैशांची मागणी करायचा. पैसे दिले नाहीतर तुम्हाला ठार करेल, अशी दमदाटी करायचा. दरम्यान, बुधवारी (6 जानेवारी) सतीश पुन्हा दारून पिऊन घरी आला आणि घरच्यांना शिवीगाळ करायला लागला. या त्रासाला वैतागून मायाबाई हिने सतीशचा कायमचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार, मायाबाई हिने आपला मोठा मुलगा आणि भाचा यांच्या मदतीने गुरुवारी (7 जानेवारी) पहाटे सतीशवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर सतीशचा मृतदेह दोन-तीन प्लास्टिकमध्ये गुंडाळला आणि एका गोणीत भरून सकाळी 6 वाजताच्या सुमारास कसारा घाटातील दरीत फेकला. हे देखील वाचा- Nagpur: चिकन फ्राय बनवून देण्यास नकार दिला म्हणून मद्यपींनी चक्क हॉटेललाच लावली आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यांचा मृतदेह कसारा घाटात आढळून आला आहे अशी माहिती एका अज्ञात व्यक्तीने फोनच्या माध्यमातून दिली आहे. अशी तक्रार शिवाजी आगळे याने पोलिसांत नोंदवली होती. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे त्यांना सतीशचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात करून अवघ्या काही तासांतच या हत्येचा छडा लावला.