
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांना (Industrial and Logistics Infrastructure) मोठी चालना देण्यासाठी, राज्य सरकारने यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन ग्रुपच्या उपकंपन्या- नेक्सस इंडस्ट्रियल पार्क्स (पूर्वीचे एक्ससिओ लॉजिस्टिक्स पार्क्स) आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्ससोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. हा करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे.
या करारानुसार महाराष्ट्रात 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जमीनीचे क्षेत्रफळ आहे. यापैकी 1.85 कोटी चौ. फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ही ₹5,127 कोटी आहे. या करारामुळे थेट व अप्रत्यक्ष अशी एकूण 27,510 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. हे लॉजिस्टिक्स पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत. (हेही वाचा: Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना)
हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणारे असून, महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 शी सुसंगत असेल. ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक व लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग व पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना ही परिवर्तनत्मक भागीदारी निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.