Maharashtra Monsoon 2021: महाराष्ट्रात आज मान्सून दाखल- IMD
Monsoon | Photo Credits: Pixabay.com)

केरळमध्ये 3 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनता मान्सूनच्या प्रतिक्षेत होती. पुढील 2-3 दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये आणि महाराष्ट्र, गोव्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र आजच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, असे हवामान खात्याने सांगितले. राज्यात दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाड्याच्या काही सलग्न भागापर्यंत मान्सून पोहचला असून पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची बातमी सर्वांसाठी सुखावह आहे. आता मान्सून उर्वरीत राज्यभरात कधीपर्यंत पोहचणार, याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पुढीचे काही दिवस ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Monsoon 2021: मान्सून केरळमध्ये दाखल, भारतात पावसाळा सुरु)

K S Hosalikar Tweet:

यंदा मान्सून 21 मे रोजी अंदमानात दाखल झाला. त्यानंतर तो 1 जूनला केरळ तर 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र केरळमध्ये 3 जूनला आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात धडकला आहे. दरम्यान, यंदा देशात सामान्य पाऊस  होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.