Monsoon 2022: भारतात यंदा सरासरीच्या 103% पावसाचा अंदाज; पहा IMD चे ताजे अंदाजपत्र
Monsoon Rains | (file image)

अंदमान आणि केरळ मध्ये यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्राला मान्सूनची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या पोषक वातावरण असल्याने येत्या काही दिवसांत मान्सून तळकोकणात आणि पुढे संपूर्ण राज्य व्यापून टाकणार आहे. सोबतच आज भारतीय हवामान खात्याने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. यावर्षी पूर्वीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये 103% पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

14 एप्रिलला जाहीर केलेल्या अंदाजपत्रामध्ये देशात सरासरीच्या तुलनेत 99% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आता हाच अंदाज 103% वर्तवण्यात आला आहे. यामध्ये 4% कमी-अधिक पावसाची शक्यता आहे.(हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहचण्याचा IMD चा अंदाज).

महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या प्रदेशासोबत पूर्व विदर्भात पाऊस सामान्य पडेल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि विदर्भात तीन ते चार जिल्ह्यांमध्ये पावासाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशामध्ये मध्य भारत आणि दक्षिणेकडील भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस असेल. उत्तर-पूर्व भारत आणि पश्चिम भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस होणार आहे. पूर्वोत्तर भागातील मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आदी राज्यांमद्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.