Rains in Mumbai | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात नेहमीपेक्षा यंदा काहीसा लवकरच दाखल झालेला मान्सून ( Monsoon 2021) मुंबईत बेफाम बरसत (Rains in Mumbai) आहे. पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने मुंबईत पाणी पाणी केले. त्यामुळे सखल भागात पाणी साचलेच. परंतू, रेल्वे आणि रस्ते वाहतूकही खोळंबली. कोरोना व्हायरस महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेला मुंबईकर आज जिथे होता तिथेच अडकला. अद्यापही मुंबईत मान्सूनच्या पावसाची संततधार कायम आहे. मुंबईसोबतच कोकणातही अशीच स्थिती आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) पावसाचे रौद्र रुप पाहून इशारा दिला आहे. मुंबई आणि कोकणसाठी अलर्ट (Red Alert Issued for Mumbai) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळू शकतो.

कोकणासोबतच मुंबई आणि मराठवाड्यातही मान्सूनने आगमन केले आहे. अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणाचा एकूण नूर पाहून हवामान विभागाने कोकण किनारपट्टीलगत काही ठिकाणी 'रेड अलर्ट' तर काही ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतही पुढील चार दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनेही नेहमीप्रमाणे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आणि आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे. (हेही वाचा, What Is Red, Orange And Yellow Alert: रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय? ते कधी जारी केले जातात? जाणून घ्या सविस्तर)

मुसळधार पाऊस, पाणीच पाणी

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहिल्याच दिवशी पावसाने मुसळदार आगमन केल्याने मुंबईकरांची त्रेधातीरपीट तर उडालीच. परंतू, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. प्रामुख्याने सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आदी ठिकाणी मुंबई तुंबल्याचे पाहायला मिळाले.

ट्विट

वाहतूक सेवा कोलमडली

मुसळधार पावसामुळे मुंबईत लोकल सेवा थांबली. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वेसेवा थांबविण्यावाचून पर्याय नव्हता. रस्त्यांवरही पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली. प्रामुख्याने सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली.