राज्यातील कोरोना निर्बंध शिथील करत परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे. असे असताना मुंबई लोकल (Mumbai Local) मात्र अद्यापही यार्डात आहे. सर्वसामान्यांसाठी ती अद्यापही खुली नाही. त्यामुळे कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या म्हणजेच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकल सुरु करा अशी मनसेची मागणी आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन मनसेने (MNS) उच्च न्यायालयात (Bombay High court) हस्तक्षेप याचिका (Intervention Application) दाखल केली आहे. या याचिकेवर आज (5 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.
मनसे आगोदर बार कौन्सिलनेही याचिका दाखल केली आहे. ज्या वकिलांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. आता मनसेनेही अशाच प्रकारची याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, मुंबई लोकलच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत मनसेने जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले होते की, 'ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्यावी.राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल'. (हेही वाचा, MNS on CM Uddhav Thackeray: पाठीवर 'शिव पंख' लावून द्या, मग लोक कामावर जातील; मुंबई लोकलवरुन मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला)
मुंबई लोकल प्रवास सर्वसामान्यांना खुला नसल्याच्या कारणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही मनसेने जोरदार टीका केली होती. ही टीका करताना संदीप देशपांडे यांनी ''सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो. गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे. या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी'', असे म्हणत टोला लगावला होता.