राज्या सरकारने शिथील केलेल्या निर्बंधांमध्ये मुंबई लोकलला दिलासा मिळाला नाही. निर्बंध शिथिल झाले तरी मुंबई लोकल अद्यापही (Mumbai Local) सुरु नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. 'आमचे मुख्यमत्री जगात भारी आहेत. त्यामुळे ते काहीही करु शकतात. त्यांनी लोकांच्या पाठीवर 'शिवपंख' लावून द्यावेत, म्हणजे लोक उडत उडत कामावर जातील' असा टोला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाच मुंबई लोकल (Mumbai Local) सुरु न केल्याबद्दल लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो. गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे. या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता. आमचा सीएम जगात भारी.'' (हेही वाचा, Maharashtra Unlock Guidelines: महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली जाहीर; जवळपास 25 जिल्ह्यांना दिलासा, 'या' ठिकाणी निर्बंध कायम)
कोरोना काळात सरकारने घातलेल्या विविध निर्बंधावरुन मनसे नेहमीच आक्रमक राहिली आहे. या आधीही मनसेने अनेक वेळा आक्रमक पवित्रा घेत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोरोना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता द्यावी असेही मनसेचे म्हणने आहे. ज्या लोकांनी कोरोना लसीचे दन्ही डोस घेतले आहे त्यांना मुंबई लोकल प्रवासाची परवाणगी द्यावी, अशी मनसेची प्रमुख मागणी आहे. नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या अन्यथा जेलभरो आंदोलन करु असेही मनसेने म्हटले आहे.
सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2021
राज्य सरकारने नव्याने कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता दिली. हे निर्बंध 22 जिल्ह्यात शिथील करण्यात आले. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळ ते रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास मुभा आहे. तसेच, शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यात येतील. तर रविवारी दुकाने पूर्णपणे बंद असतील असे नव्या निर्बंधांमध्ये राज्य सरकारने म्हटले आहे. या सर्व बदलत्या निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारे रेल्वेचा उल्लेख नाही. त्यामुळे ही निर्बंध शिथीलता मुंबई लोकलच्या वाट्याला आली नाही.