महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election) प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. 18 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशात 17 नोव्हेंबर दिवशी निवडणूकीपूर्वीच्या शेवटच्या रविवारी शिवतीर्थ (Shivtirth) वर जाहीर सभा घेण्यासाठी मनसे आणि उबाठा कडून अर्ज देण्यात आले होते. मात्र अद्याप अधिकृत परवानगी न मिळाल्याचं सांगत आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील आयोजित सभा आता होणार नसल्याचं जाहीर केले आहे. आज राज ठाकरे यांनी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना ही माहिती दिली आहे.
17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे त्यामुळे उबाठा कडूनही शिवतीर्थ साठी अर्ज करण्यात आला होता. परंतू मनसेच्या राज ठाकरेंच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क वर सभा जाहीर झली होती. आज राज ठाकरेंनी बोलताना दीड दिवसात तयारी करणं घाईचं होणार असल्याने या जाहीर सभे ऐवजी मुंबई ठाण्यामध्ये सभा आणि दौरे घेतले जातील असं जाहीर करण्यात आले आहे.
राज ठाकरेंचा जाहीरनामा
राज ठाकरे यांनी 150 पेक्षा जास्त उमेदवार विधानसभेसाठी जाहीर केले आहेत. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे' या स्वप्नासह राज ठाकरे यंदाही निवडणूक लढवत आहेत. त्याच अनुशंगाने आता मनसे सत्तेत आल्यानंतर काय आणि कसं करणार याची माहिती त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. Raj Thackeray Releases MNS Manifesto: आम्ही हे करू! राज ठाकरेंकडून मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहेत खास घोषणा? जाणून घ्या .
दरम्यान शिवाजी पार्क हे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उमेदवार असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे या जाहीर सभेकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. सध्या राज ठाकरेंनी उमेदवार जिंकून येण्याची शक्यता असलेल्या भागातच अधिकाधिक सभांवर जोर दिला आहे.