विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा (Maharashtra Gram Panchayat Election 2020) कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही (MNS) कंबर कसली आहे. या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत.
या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे देखील वाचा- Defaulter Bungalow Of Minister's In Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्याचे बंगले डिफॉल्टर यादीत, पाणीपट्टीही थकली
मनसेने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेला धक्का देण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहे, असेही बोलले जात आहे. मनसेच्या या निर्णयामुळे शिवसेनाला मोठा फटका बसून भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.
एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, संपूर्ण देशात उद्ववलेल्या कोरोना महामारीमुळे 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.