विधानसभा निवडणुकीच्या (Mahrashtra Assembly Election) तोंडावर सर्वच पक्ष हे एकमेकांवर व्यक्तिगत, राजकीय टीका करत चिखलफेक करताना दिसत आहेत मात्र या सगळ्यामध्ये मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केल्याचे समोर येत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला निवडणूक पूर्व मुलाखत देत असताना शिवसेना- भाजपा युती तसेच सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न करताच राज यांनी कौतुक करत "फडणवीस हा व्यक्तिशः भला माणूस असल्याचे सांगितले , पण याला जोडून राज यांनी फडणवीस यांच्यातील आक्षेपार्ह्य गोष्टींचा लेखाजोगा सुद्धा वाचून दाखवला.
राज यांनी आपल्या मुलाखतीत सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचे विश्लेषण करत असताना, "तुम्ही जर का काम करत असाल तर ती पूर्ण झाली असे खोटे बोलण्याची काहीही गरज नाही, फडणवीस हे कितीही चांगले असले.. त्यांना कितीही मते मिळत असली तरी लोकांशी खोटं बोलणे हे वाईटच असेही राज म्हणाले. या विधानावर आरे जंगलाची एकाएकी केलेली तोड किंवा पीएमसी बँकेचा घोटाळा अशी उदाहरणे देत राज यांनी सरकार व परिणामी फडणवीस यांची लोकांना उत्तर देण्याची पद्धत चुकत असल्याचे सांगितले.
येत्या निवडणुकीसाठी मनसे तर्फे 104 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, तसेच काही दिवसांपूर्वी एका सभेत राज यांनी आपल्याला सत्तेत आणण्याऐवजी एक प्रबळ विरोधी पक्ष बनवा असे आवाहन केले होते. याबाबत देखील आज मुलाखतीत राज यांनी" राज्याला सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एका विरोधकाची गरज आहे, सध्याचा विरोधक दुबळा पडल्याने राज्यात समस्या निर्माण होत आहेत अशा शब्दात विरोधकांवर टीका करत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी बद्दल बोलत असताना आदित्य आपल्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आले नसले तरी तो त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे, त्यासाठी अभिनंदन असे म्हणत राज यांनी पाठिंबा दर्शवला.