Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आता येत्या नऊ एप्रिल रोजी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याचे वृत्त आहे. ही सभा ठाणे (Thane) येथे पार पडणार आहे. या सभेला 'उत्तर सभा' म्हणूनही संबोधले जाऊ लागले आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मुंबईतील शिवाजी पार्क येथून केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे मांडले. यापैकी मशिदीवरील भोंगे आणि त्या विरोधात हनुमान चालीसा यावरुन घेतलेल्या भूमिकेवरून सर्वाधिक वाद निर्माण झाला. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे ते टीकेचे धनी तर झालेच. परंतू, मनसे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर संभ्रमीत झाले. त्यामुळे एकूणच पार्श्वभूमीवर ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे राज्य सरकारने उतरवावेत नाहीतर मनसे कार्यकर्ते ते उतरवतील. तसेच, हनुमान चालीसा लावून त्याचा विरोध केला जाईल असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचे पठण विविध ठिकाणी सुरु केले. यावरुन वाध वाढू नये यासाठी महाराष्ट्रप पोलिसांनी तातडीने पावले उचलत कारवाई सुरु केली. तर, गृहमंत्र्यांनी शांततेचे अवाहन करत शांतताभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असे म्हटले. (हेही वाचा, Pune MNS Muslim Workers Resign from Party: राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे)

दुसऱ्या बाजूला मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही मोठी नाराजी पाहायला मिळाली. पुणे येथील काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. पुणे मनसेचे नेते आणि पदाधिकारी वसंत मोरे यांनी तर थेट नाराजी व्यक्त करत म्हटले की, राज ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी दिलेला आदेश ही पक्षाची भूमिका आहे. पक्षाची भूमिका म्हणून त्यांचा आदेश ठिक आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून हा आदेश पालन करताना आमच्या समोर अनेक अडचणी आहेत. माझ्या वॉर्डमध्येच अनेक धर्माचे लोक राहतात. त्यातील अनेक लोक हे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही काय भूमिका घ्यावी याबाबत आमच्यात काहीसा संभ्रम आहे.