MNS Chief Raj Thackeray & PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा कहर सुरु आहे. त्यातच रेमडेसिवीर (Remdesivir) औषधांसह इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीत मागील काही दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राजकारण रंगत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद होत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना विनंती पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 'रेमडेसिवीर आणि इतर कोरोना औषधे आणि साहित्य खरेदी-वितरणाचे अधिकार राज्यांना द्यावेत,' अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी हे पत्र शेअर केले आहे. पत्रात राज ठाकरे लिहितात, "देशात कोरोनाने हाहा:कार माजवला असून ही वेळ भीषण आहे. राजकारणाची नाही. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोसळली आहे. त्यामुळे साथरोग बाबतीतलं व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज आहे. 100 वर्षांतलं हे मोठं आरोग्य संकट असून यात रेमडेसिवीर सारख्या अत्यंत आवश्यक इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार करणार असल्याच्या बातमीने मला धक्का बसला."

भाषणात तुम्ही राज्याला मार्गदर्शन सूचना केल्यात मग रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्राकडे ठेवण्याचं प्रयोजन काय? असा सवालही त्यांनी पुढे विचारला आहे. ते लिहितात, "राज्यांमध्ये राज्य सरकारचं आरोग्य विभाग, महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी विविध पातळीवर काम करत असताना केंद्रानं रेमडेसिवीरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय?"

"कोरोना विरुद्धच्या लढ्यात केंद्राची भूमिका साहाय्यकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. अशावेळी रेमडेसिवीरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवल्याने राज्य सरकारी यंत्रणांवर अविश्वास दिसतो आणि त्यांना कमी लेखल्यासारखे वाटते. त्यामुळे रेमडेसिवीर कसं घ्यायचं, कुठे आणि कसं वितरित करायचं याची संपूर्ण जबाबदारी राज्य यंत्रणांकडे सोपवावी," अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबतीत सकारात्मक विचार करुन राज्य सरकारांना तुम्ही स्वातंत्र्य द्याल, अशी आशाही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

राज ठाकरे ट्विट:

यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी कोरोना संबंधित उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर केंद्राकडून हापकिनला लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली होती. त्याबद्दल राज ठाकरे यांनी मोदींचे आभारही मानले होते.