MNS Chief Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात सरकारला कराव्या लागलेल्या 'लॉकडाऊन' (Lockdown) काळात अनेक मंडळी आपल्या मदतीचे जाहीर प्रदर्शन मांडत आहेत. असे प्रदरेशन मांडून कॅमेऱ्यासमोर चमकोगिरी करणाऱ्या महाभागांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चांगलेच फटकारले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या @RajThackeray या अधिकृत ट्विटर हँडलवर आणि @RajThackeray फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी चमकोगिरी करणाऱ्यांना फटकारतानाच निरपेक्ष भावनेने मदत करणाऱ्या मंडळींचे कौतुकही केले आहे.

कोरोना व्हायरस संकटकाळी नियंत्रणाचा उपाय म्हणून अवघा देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रही लॉकडाऊन असल्याने ठप्प झाला आहे. अशा स्थितीत हातावर पोट असलेल्या, स्थलांतरीत कामागर, नागरिक आणि गोरगरीब गरजू जनतेवर उपासमार, हालाकिची स्थिती ओढावली आहे. अशा स्थितीत राज्य, केंद्र सरकारसोबतच काही राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना गरजूंना मदतीचा हात देत आहेत. मात्र, यातील काही मंडळी ही मदत करताना कॅमेऱ्यासमोर चमकोगिरी करताना दिसतात. संकट काळात मदत करताना फोटो काढतात. राज ठाकरे यांनी नेमके याच मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. (हेही वाचा, Coronavirus: अभिनेता शाहरुख खान याच्याकडून महाराष्ट्राला 25,000 PPE Kits; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार)

राज ठाकरे फेसबुक पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र

कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंजत आहे आणि त्यात महाराष्ट्र सैनिक देखील जमेल त्या पद्धतीने कार्यरत आहेत, लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत. अर्थात राज्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि तो आत्ताही जात आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.

ह्या मदतकार्याची छायाचित्रं connectrajthackeray@gmail.com वर येत आहेत जे मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, ज्याचा उद्देश इतकाच की त्या त्या भागातील लोकांना काही गरज असल्यास कोणाशी संपर्क साधावा हे कळावं.

पण ह्या सगळ्यात एक बाब जाणवली ती म्हणजे त्यातले काही मोजके जणं कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे ह्या चुकीच्या गोष्टी करत आहेत.

आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे, अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का?

ह्या कठीण प्रसंगात फक्त महाराष्ट्र सैनिकच नाहीत तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मनापासून मेहनत घेत आहेत, मदतीला धावून जात आहेत. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. माझं त्यांना पण आवाहन आहे की तुम्ही देखील ह्याचा विचार करावा. महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया.

तसंच महाराष्ट्र सैनिकांनो, जर ह्या पुढे कोणत्याही मदतकार्याची छायाचित्रं ई-मेलवर पाठवली जाणार असतील त्या मदतीच्या प्रमाणाचे, साहित्याचे, संपर्कस्थळाचे इत्यादी पुरती छायाचित्रं मर्यादित असतील हे बघावं. तसंच ह्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक दररोज काही ना काही मदत करत आहेत पण रोज त्या मदतीला अधिकृतवर प्रसारित करणं शक्य पण नाही आणि ते यथोचित होणार नाही. बाकी तुम्ही करत असलेलं काम उत्तम आहे ते सुरु ठेवावं, तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत काम करत आहात त्याचा मला अभिमान आहे.

सगळ्यात महत्वाचं, सर्व राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की हे मदतकार्य करत असताना तुम्ही स्वतःची, तुमच्या कुटुंबाची पण नीट काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि प्रशासनाला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन काम करा.

आपला नम्र,

राज ठाकरे

दरम्यान, राज्यातील विविध राजकीय पक्ष, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, उद्योजक, नामवंत मान्यवर आणि सर्वसामान्य जनताही महाराष्ट्र सरकारला मदत करत आहे. अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधित ही रक्कम जमा केली आहे. काहींनी वस्तू, वैद्यकीय सेवा, उपचार, वैद्यकीय वस्तूंच्या रुपात ही मदत दिली आहे.