राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले चिरंजीव अमितच्या विवाहाचे निमंत्रण, पंतप्रधान मोदींना वगळल्याची चर्चा
राहुल गांधी आणि राज ठाकरे (संग्रहित प्रतिमा)

Amit Thackeray Mitali Borude Wedding : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Congress President Rahul Gandhi)  यांना चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विवाहाचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. राज यांनी खास दूत गुप्तपणे पाठवून हे निमंत्रण दिल्याचे समजते. दरम्यान, राज यांनी पंतप्रधान मोदी यांना मात्र विवाहाचे निमंत्रण दिले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चिरंजीव अमित यांच्या विवाहाचे राज यांनी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांना निमंत्रण दिले आहे. राज ठाकरे हे स्वत: राहुल गांधी यांना भेटून निमंत्रण देणार होते. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलत राज यांनी हर्षल देशपांडे आणि मनोज हेते या दोन दूतांकरवी हे निमंत्रण दिल्याचे न्यूज 18 ने म्हटले आहे.

दरम्यान, राज यांच्याय या निमंत्रणाचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.  त्यानुसार काँग्रेस आणि मनसे यांच्यात पडद्यामागून राजकीय हालचाली सुरु असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज यांनी उद्योगपती रतन टाटा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, यांच्यासह अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनाही निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, वरबाप राज ठाकरे 'मातोश्री'च्या भेटीला, बंधू उद्धव ठाकरे यांना दिले अमित यांच्या लग्नाचे निमंत्रण)

दरम्यान, अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा येत्या 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मनिटांनी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या सेंट रेजिस या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित ठाकरे मताली बोरुडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकत आहे. मिताली ही बॅरिअॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी आहे. आमित आणि मिताली हे दोघेही एकमेकांचे दीर्घकाळापासून मित्र राहिले आहेत. दीर्घकाळच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात होत आहे.