राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक कौटुंबिक भेट

Amit Thackeray - Mitali Borude Wedding : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या वरबापाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. अर्थात आपल्याला माहित असेलच राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे विवाहबद्ध होत आहेत. त्यामुळे अमित यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास काही दिग्गजांकडे राज स्वत: जात आहेत. रतन टाटा यांना विवाहाचे पहिले निमंत्रण दिल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'वर पोहोचले. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण दिल्यावर बंधू जयदेव ठाकरे यांनाही डल्लास हाऊस येथे जाऊन राज यांनी अमित यांच्या विवाहाचे निमंत्रण दिले. राजकीय मतभेद असले तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कौटुंबिक ओलावा मात्र कायम ठेवला आहे. त्यामुळे एकमेकांच्या सुख-दु:खात दोघेही सहभागी होतात.  महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा एक वेगळा आणि उठावदार पैलूच म्हणावा लागेल.

अमित ठाकरे यांच्या विवाहाला राजकीय वर्तुळासोबतच इतरही विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे स्वत: हजर राहणार आहेत, असे समजते. दरम्यान, भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यातही नुकतीच भेट झाली होती. या भेटीत भाजपच्या कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे यावर चर्चा झाली होती, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांनाही निमंत्रण जाणार का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Amit Thackeray Mitali Borude Wedding : राज ठाकरेंची होणारी सून Mitali Borude नेमकी कोण ?)

दरम्यान, अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा येत्या 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मनिटांनी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या सेंट रेजिस या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित ठाकरे मताली बोरुडे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकत आहे. मिताली ही बॅरिअॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी आहे. आमित आणि मिताली हे दोघेही एकमेकांचे दीर्घकाळापासून मित्र राहिले आहेत. दीर्घकाळच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात होत आहे.