Mission Begin Again: पुणेकरांना दिलासा! 23 जुलै पासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नाही, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची सूचक माहिती
Naval Kishore Ram | (Photo Credit: YouTube)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनाची भीती, सातत्याने लागू करण्यात येणारा लॉकडाऊन (Lockdown) या मुळे अगतिक झालेल्या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या 23 जुलै पासून पुणे (Lockdown in Pune) जिल्ह्यात लॉकडाऊन नसेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांनी दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा आहे. लॉकडाऊनचा आजचा सातवा दिवस आहे. त्यामुळे तीन दिवसांनंतर पुढे लॉकडाऊन संपणार की वाढणार? यााबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुगणांची वाढती स्थिती पाहता लॉडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनला नागरिकांनी चांगले सहकार्य केले. नागरिकांच्या सहकार्यामुळे यापुढे लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यात लॉकडाऊन असणार नाही, परंतू नागरिकांना सरकारने केलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करावे लागेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. (हेही वाचा पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना व्हायरस मुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यु; वाचा कलापुरे कुटुंबाची हृदयस्पर्शी व्यथा)

दरम्यान, पुणे शहरात लॉकडाऊन असणार नाही, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले असले तरी, नियम आणि सूचनांबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तसेच, एकदम सर्व लॉकडाऊन हटवणार की हूहळू टप्प्याटप्याने तो हटवण्यात येईल याबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. दरम्यान, रुग्णसंख्या वाढती आहे हे खरे आहे. परंतू, असे असले तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. रुग्णांना बेड कमी पडणार नाहीत. हळूहळू रुग्णसंख्या कमी होईल, असेही नवलकिशोर राम यांनी म्हटले.