खुशखबर! मुंबई आणि ठाण्यात परवडणा-या किंमतीत घरं घेण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण; जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या घरांबाबत केली 'ही' मोठी घोषणा
Jitendra Awhad and Mhada (Photo Credits: PTI and FB)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) सामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच नोक-या, व्यवसाय या सर्वांचा यावर गंभीर परिणाम झाल्याने लोकांचे मुंबई-ठाण्यात स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. यामुळे लोकांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचललाय म्हाडा (Mhada) ने. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. म्हाडाकडून लवकरच मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) तुम्हाला परवडणारी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती आव्हाडांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

“म्हाडा स्थापन करण्यामागे मुंबई आणु मुंबई उपनरांमध्ये गोरगरिबांना परवडणारी घरं मिळाली पाहिजेत असा उद्धेश होता. म्हाडाच्या मार्फत कन्न्मवार नगर, ज्ञानेश्वर नगर, अभुदय नगर, आदर्श नगर असे अनेक प्रकल्प उभे राहिले. यांच्या मार्फत लोकांना परवडणारी घरं मिळाली. पण 1980 च्या दशकानंतर एकही असं नगर बनू शकलेलं नाही” असे जितेंद्र आव्हाड एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. घर खरेदीसाठी म्हाडाच्या नावे फिरत आहेत खोटे संदेश; MHADA कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दरम्यान “मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन परवानगी घेणार आहे. ते परवानगी देतील असा मला विश्वास आहे. काही जमिनी वादात असून कोर्टात अडकून आहेत. त्या जमिनी म्हाडा विकत घेऊ शकतं. बिल्डर जिथे आठ हजाराला घरं विकतो तिथे म्हाडा साडे चार, पाच हजारांमध्ये ते घर विकू शकतं. लोकांना परवडणारी घरं देऊ शकलो तर म्हाडाचा मूळ उद्देश सार्थकी लागेल,'' असंही ते पुढे म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या या घोषणेनंतर मुंबई-ठाण्यात स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणा-या नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे आव्हाडांनी सांगितले आहे.