Uddhav Thackeray (Photo Credits: CMO Maharashtra)

कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाचं ट्रॅकींग आणि टेस्टींग मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज दिले आहेत. मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी व कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रतिबंधासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विरोधात राज्यात जे काम सुरू आहे त्याबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केलं आहे. मुंबईत यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, ही लढाई अजून संपलेली नाही. राज्यातील कोरोना रुग्म कमी झाले पाहिजेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिले जाते. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारचं, उपचारात त्याचा वापर केला जावा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. (हेही वाचा - गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्यावी; महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी)

पावसाळ्यामुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्यादेखील वाढणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. ट्रॅकींग आणि टेस्टींग वाढविण्यात यावे आणि संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा देखील वाढवण्यात यावी, अशा सुचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावे. भूमिगत कामांच्या ठिकाणी पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा, अशा सुचनादेखील मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

दरम्यान, यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, वॉर्ड अधिकारी आदी सहभागी झाले होते.