Mayoral Elections 2019: मुंबई, पुणे, नाशिक शहारांमध्ये पहा महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर आला निवडून?
Mayoral Elections 2019 | Photo Credits: Twitter

मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यात आज प्रमुख शहरांमध्ये महपौर निवडीसाठी निवडणूक पार पडली. कुठे महापौर बिनविरोध निवडला गेला तर कुठे राजकीय समीकरणाची जुळवाजुळव केलेली बघायला मिळाली. मुंबईमध्ये शिवसेनेने आपला गड पुन्हा राखत किशोरी पेडणेकर यांना महापौर केले आहे. तर लातूरमध्ये भाजपाला बहुमत असतानाही राजकीय उलथापालथ बघायला मिळाली आहे. लातूरमध्ये कॉंग्रेसचा नगरसेवक महापौरपदी विराजमान झाला आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेनेही कॉंग्रेस, एनसीपीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं पहायला मिळालं आहे. मग जाणून घ्या महाराष्ट्रात महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये कुणाचा महापौर झाला आहे?

मुंबई महापौर

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर सुहास वाडकर उप महापौरपदी निवडले आहेत. किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. बीएमसी मुख्यालयामध्ये आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर; तर सुहास वाडकर उपमहापौर पदी विराजमान.  

पुणे महापौर

पुण्यामध्ये मुक्ता टिळक यांच्यानंतर भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांची पुण्याच्या महापौरपदी निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात प्रकाश कदम यांचे आव्हान होते. शिवसेना नगरसेवकांनी आज कॉंग्रेस, एनसीपीच्या उमेदवाराला मतदान केले. दरम्यान पुण्यात भाजपाचे 2 नगरसेवक अनुपस्थित होते. प्रकाश कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांचा 38 मतांनी पराभव केला.

लातूर महापौर

लातुरमध्ये भाजपाकडे बहुमत असूनही कॉंग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचा विजय झाला आहे. हा माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा धक्का समजला जाणार आहे. भाजपला मोठा धक्का! लातूर महानगर पालिकेत बहुमत असतानाही काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी.

पिंपरी चिंचवड महापौर

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे यांची निवड झाली आहे तर महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा 40 मतांनी पराभव झाला आहे.

नाशिक महापौर

नाशिक शहराच्या महापौर पदी सतीश कुलकर्णी यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्या भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अमरावती महापौर

अमरावतीमध्ये महापौरपद भाजपाच्या चेतन गावंडे यांना मिळाले आहे. उपामहापौर पदी भाजपाच्या कुसुम साहू यांची निवड झाली आहे.

नागपूर महापौर

नागपूर महानगर पालिकेत महापौर पदाच्या निवडणूकीत भाजपाच्या संदीप जोशी यांचा विजय झाला आहे.

परभणी महापौर

परभणीमध्ये कॉंग्रेसच्या अनिता सोनकांबळे महापौर तर भगवान वाघमारे उपमहापौर पदी विराजमान झाले आहेत.

अकोला महापौर

अकोला महापौर पदावर अर्चाना मसने यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी राजेंद्र गिरी विराजमान झाले आहेत.

दरम्यान राज्यात सत्तेची कोंडी आहे. बहूमताचा आकडा गाठू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.