किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर; तर सुहास वाडकर उपमहापौर पदी विराजमान

मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) व उपमहापौर (Mumbai Deputy Mayor) पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची महापौर पदासाठी तर अ‍ॅड. सुहास वाडकर (Adv. Suhas Wadkar) यांची उपमहापौर पदी बिनविरोध नेमणूक झाली आहे.

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर; तर सुहास वाडकर उपमहापौर पदी विराजमान
Kishori Pednekar And Suhas Wadkar (Photo Credits: Twitter)

मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) व उपमहापौर (Mumbai Deputy Mayor) पदासाठी आज, 22 नोव्हेंबर रोजी महापालिका कार्यलयात निवडणूक घेण्यात आली. शहरातील मुख्य पक्ष भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या निवडणुकीतून अगोदरच माघार घेतल्याने यंदाही शिवसेनेने महापौर व उपमहापौर पदी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पूर्व महापौर विश्वनाथ महाडेश्वर (vishwanath Mahadeshawar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची महापौर पदासाठी तर अ‍ॅड. सुहास वाडकर (Adv. Suhas Wadkar) यांची उपमहापौर पदी बिनविरोध नेमणूक झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आजच्या निवडणुकीसाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अनिल परब, माजी मंत्री रामदास कदमव अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपचे सर्व निवडून आलेले नगरसेवक देखील यावेळी उपस्थित होते. काहीच वेळात शिवसैनिकांसहित नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर हुतात्मा चौकात (Hutatma Chowk)  जाऊन अभिवादन करणार आहेत.

वास्तविक, विधानसभा निवडणुकीत सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून महायुती म्हणजेच शिवसेना व भाजपामध्ये फूट पडली असताना मुंबईच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून बाजूला करत आपले वर्चस्व निर्माण करण्याची भाजपला संधी होती. मात्र यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या बाजूला करावे लागले असते. पण या पर्यायाला टाळून "आम्ही सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाणार नाही तर पुढील वेळेस स्वतःच्या संपूर्ण संख्याबळावर सत्तेवर दावा करू", अशी भूमिका भाजपने घेतली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी माहिती देत भाजपाने महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे कळवले.

दुसरीकडे, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत युती करून सत्तास्थापनेच्या विचाराधीन असल्याने महाविकासाआघाडीचा मान ठेवत दोन्ही पक्षांकडून सेनेला महापौर निवडणूक बिनविरोध जिंकू देण्याचा पवित्रा स्वीकारण्यात आला होता. परिणामी आता शिवसेनेने पालिकेवरील अस्तित्व टिकवून किशोरी पेडणेकर यांच्या हाती मुंबईच्या महापौर पदाची धुरा सोपवली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2019 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).