साध्वी कांचन गिरी (Kanchan Giri) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. याला आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "बाळासाहेबांचा मुलगा काय करू शकतो आणि काय नाही याचं सर्टिफिकेट तुम्ही देण्याची गरज नाही," असं म्हणत त्यांनी कांचन गिरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "धार्मिक क्षेत्रातील लोकांनी राजकारणात पडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही गुरू माँ असा किंवा गुरू पिता, त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. पण थेट राजकीय वक्तव्य करू नका. बाळासाहेबांचा मुलगा काय करू शकतो आणि काय नाही याचं सर्टिफिकेट तुम्ही देण्याची गरज नाही."
पुढे त्या म्हणाल्या की, "राम मंदिरासाठी शिवसेनेनं दिलेलं योगदान कोणी विसरणार नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन आले तेव्हा हे सगळे कुठे होते? आता तुम्हाला ज्यांना डोक्यावर घ्यायचं त्यांना घ्या. तुम्हाला जो अजेंडा चालवायचा तो चालवा. आमचं काही म्हणणं नाही. पण हिंदुत्वाच्या फूटपट्टया घेऊन बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना मोजण्याचा प्रयत्न करू नका." त्याचबरोबर देशातील नवहिंदुत्व मान्य नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले होते, याचीही आठवण महापौरांनी यावेळी करुन दिली.
"यूपी आणि बिहारीवर हल्ले होत होते, तेव्हा या ज्या कोणी माँ आहेत, त्या कुठं होत्या? स्वत:ला माँ म्हणवता ना? मग तसं वागा," असा टोलाही त्यांनी लगावला. (हे ही वाचा: Nitesh Rane Letter to Kishori Pednekar: मुंबई मधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन नितेश राणे यांचे महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र; दिला 'हा' इशारा)
काय म्हणाल्या होत्या कांचन गिरी?
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे, ते करायचे. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे. पण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमधार्जिण्यांसोबत पार्टी बनवली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत, असं साध्वी म्हणाल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मात्र गुणगान गायले. राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, आज त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना अयोध्या दौऱ्याचं आमंत्रण दिलं आहे.