मुंबई (Mumbai) मधील रस्त्यांवरील खड्डांवरुन मागील अनेक दिवसांपासून विरोधकांकडून बीएमसी (BMC) वर टीका केली जात आहे. मनसे नेते अमित ठाकरे (AmitThackeray) यांनी काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरुन शिवसेनेला (ShivSena) लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना पत्र लिहून त्यांनी "दिवाळीपूर्वी खड्ड्यांबाबत ठोस पाऊलं उचला अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु," असा इशारा दिला आहे. "एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा," असा टोलाही त्यांनी पत्रातून लगावला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या पत्रात लिहिले की, "गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु, त्यांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही त्यांची रास्त अपेक्षा होती. परंतु, अनेक मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आप्तांचा जीव गमवावा लागला आहे." आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी 22 हजार कोटी खर्ज केले तरीही रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत. मुंबई मनपाने सामान्यांनी करातून दिलेला पैसा खड्ड्यात घातला की कॉट्रक्टर्सच्या घशात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे पत्रात ते लिहितात, "सामान्य मुंबईकरांसाठी न्या मागणाऱ्यांवर हल्ला करम्यात जी तत्परता दाखवली तीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल. दिवाळीपूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत ठोस पाऊलं न उचलल्यास मी आणि माझे भाजप युवा मोर्चाचे सहकारी आम्ही मुंबईतील रस्त्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरु." (Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या टिकेला मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर)
दरम्यान, यापूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन आपल्या संतप्त प्रतिक्रीया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करत असल्याचं म्हटलं होतं.