
खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा प्रवासी अनुभवत आहेत. खड्ड्यांमुळे काहींनी आपले प्राणही गमावले आहेत. तर अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. अशावेळी मनसे नेते अमित ठाकरे (MNS Leader Amit Thackeray) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. 'भ्रष्टाचारी आघाडी' असा उल्लेख करत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा एकमेव पक्ष रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (मुंबईत 800 हून अधिक अधिकृत खड्डे असल्याची माहिती पण नागरिकांनी व्यक्त केला संताप)
अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय." खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
अमित ठाकरे फेसबुक पोस्ट:
दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती आणि उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली होती. त्यात त्यांनी कामचुकार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तसंच रस्त्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.