Thane: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील एका पॉवरलूम कारखान्यात (Powerloom Factory) सोमवारी पहाटे मोठी आग (Fire) लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आगीत कोणीही जखमी झाले नाही, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, या आगीत कच्चा माल, तयार माल आणि यंत्रसामग्रीचा साठा पूर्णपणे नष्ट झाला आहे.
भिवंडी शहराच्या बाहेरील खोनी गावात असलेल्या पॉवरलूम युनिटमध्ये पहाटे 3.15 च्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक आपत्ती कक्षाचे प्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले. सकाळी 8.30 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात, गुरुवारी संध्याकाळी घाटकोपर (पश्चिम) उपनगरातील औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागली होती. सुमारे दोन तासांनंतर ती आटोक्यात आणण्यात आली होती. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
दरम्यान, मंगळवारी दुपारी उपनगरातील सांताक्रूझ (पश्चिम) येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याने 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. टागोर रोडवर असलेल्या सात मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर दुपारी 3.45 च्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी सहाव्या मजल्यावरून पायऱ्यांमधून विशेष श्वासोच्छवासाची उपकरणे घालून एक पुरुष आणि एका महिलेची सुटका केली. 65 वर्षांच्या या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचल्यावर मृत घोषित करण्यात आले. 108 रुग्णवाहिका सेवेच्या डॉक्टरांनी महिलेवर घटनास्थळी उपचार केले.