Navi Mumbai International Airport (Photo Credits: GVK group)

नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) नामकरणावरुन वाद उफाळला असून ऑल पार्टी अॅक्शन कमिटीने (All Party Action Committee) 9 ऑगस्ट रोजी मशाल मोर्चाची (Torch Protest) हाक दिली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास 15 ऑगस्टनंतर काम थांबवण्यात येईल, अशा इशारा कमिटीच्या सदस्यांनी दिला आहे. या विमानतळाला दिवंगत राजकारणी दिनकर बाळू पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. यासाठी त्यांनी कृती समितीची देखील स्थापना केली आहे.

"आंदोलनकर्ते नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड येथे विविध ठिकाणी मशाल घेऊन एकत्र येतील आणि विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करतील," असे कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले. "आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि जर सरकारने आमचे ऐकले नाही तर संघर्ष अटळ होईल, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दि. बा. पाटलांचं नाही शिवसेनाप्रमुखांचं नाव विमानतळाला देण्याचा राज्यकर्त्यांचा मानस आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. (भाजपा कार्यकर्त्यांसह प्रकल्पग्रस्त नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नावं देण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर; पहा फोटोज)

या प्रकरणावरुन 10 जून रोजी नवी मुंबई आणि रायगड मध्ये आंदोलन करण्यात आले. तसंच मागणीकडे सरकार लक्ष देत नाही म्हणून समितीने 24 जून रोजी सिडको भवनाबाहेर मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले. या दरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि स्वातंत्र्य दिनानंतर विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

या आंदोलनानंतर आयोजक आणि समितीच्या सदस्यांसह 15,000 हून अधिक नागरिकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. अलीकडेच केंद्रात मंत्री म्हणून सामील झालेले खासदार कपिल पाटील यांनीही निर्माणाधीन विमानतळासाठी दि.बा. पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. परंतु, अद्याप राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारला त्यांच्या मागण्यांची आठवण करुन देण्यासाठी 9 ऑगस्ट, क्रांतीदिनी मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.