महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य; राज्य सरकारच्या निर्णयाची चोख अंमलबजावणी होणार- वर्षा गायकवाड
Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये (Education Minister Varsha Gaikwad) मराठी विषय 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचा करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असून यंदापासून अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय आता सक्तीचा असेल राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे. यावर्षीपासून इयत्ता पहिली आणि इयत्ता सहावीसाठी मराठी विषय सक्तीचा असणार आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीसाठी मराठी विषयाची सक्ती करण्यात आली आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, 2022-23 या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर 2023-24 या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Unlock 1 ला आजपासून सुरुवात, राज्यात काय सुरु काय बंद, येथे पाहा संपूर्ण यादी

वर्षा गायकवाड यांचे ट्वीट-

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्याच्या धर्तीवर हा निर्णय घेण्याला आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करताना त्यासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठीच्या सोयी निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आलेली नाही. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलत अथवा मराठी या विषयातून पूर्णत सूट देण्याचा अधिकार शाळांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर मराठी विषय सक्तीचा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता.