मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयावर सुरु असलले आंदोलन कोणत्याही प्रकारे स्थगित अथवा थांबवण्यात आले नाही. परंतू, मान्य केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 21 दिवसांचा अवधी लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा वेळ राज्य सरकारला देण्यात येत आहे, अशी माहिती मराठा आरक्षण लढ्याचे नेते खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दिली आहे. ते नाशिक (Nashik) येथे बोलत होते. दरम्यान, राज्य सरकारने 21 दिवस काय हवे तर 1 महिन्यांचा वेळ घ्यावा. परंतू, या कालावधीत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी दिला.
मराठा आरक्षणाचा लढा सुरुच राहणार आहे. तोपर्यंत इतर मागण्या सरकारने मान्य कराव्यात. ओबिसी समाजाला देण्यात येणाऱ्या सवलती मराठा समाजालाही देण्यात याव्यात. सरकारने याबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी केली. (हेही वाचा, सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात बैठक पूर्ण, अजित पवार यांनी 13 मागण्या पूर्ण केल्याची संभाजीराजे छत्रपती यांची माहिती)
दरम्यान, मान्य केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 21 दिवसांचा वेळ देण्यात आला असला तरी आंदोलन स्थगित करण्यात आले नाही. आपण महाराष्ट्रभर दौरे करणारच आहोत. तसेच, या दौऱ्यात मराठा समाजातील नेते, आरक्षण लढ्याचे समन्वयक यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. दरम्यान, राज्य सरकारने आपला निर्णय घ्यावा अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.