internet | (Photo credit: archived, edited, representative image)

Internet Shutdown In Beed: शांततेत सुरु असेलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनास अचानक हिंसक वळण लागले. खास करुन बीड जिल्ह्यात राजकीय नेत्यांची घरे, हॉटेल्स जाळण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. परिणामी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी बीड शहरामध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय सोमवार रात्रीपासून बीडमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील वातावरण अत्यंत तणावग्रस्त झाले आहे. बीड शहरामध्ये तालुका मुख्यालयापासून साधारण पाच किलोमीटर अंतर परिसरात संचारबंदी आदेश लागू असतील. शहरातील सार्वजनिक मालमत्ता आणि खासगी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान होऊ लागलेल्या हिंसक घटनांचे मोबाईल चित्रिकरण करण्यात येत आहे. परिणामी या घटनांचे व्हिडिओ जर सोशल मीडियावरुन व्हायरल झाले अथवा नागरिकांपर्यंत पोहोचले तर, इतर प्रदेशातील भावनाही भडकल्या जाऊन अनुचित घटना घडण्याचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे तणावात आणखी भर पडू शकते. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (31 ऑक्टोबर) रात्री आठ वाजलेपासूनच इंटरनेट बंद ठेवण्याचे आदेश लागू केले आहेत. बीड शहरामध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवली जाणार आहे.

केवळ बीडच नव्हे तर इतर ठिकाणीही आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामध्ये धाराशिव, नाशिक अशा विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या गाड्या, घरे जाळली. काही ठिकाणी राज्यपरिवहन विभागाच्या एसटी बसेस जाळल्या. काही ठिकाणी तहसील कचेरीतील वाहने जाळण्यात आली. जिल्हा परिषद कार्यालय जाळण्याचाही काही ठिकाणी प्रयत्न झाला. जमाव अत्यंत प्रक्षुब्द झाल्याने अशा घटना घडल्याचे पुढे येत आहे.

दरम्यान, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे अवाहन केले आहे. समाजाच्या विनंतीला मान देत एक घोट पाणी पितो पण हिंसाचार थांबवा असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे अवाहन केले आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. काही राजकीय नेते स्वत:च्या कार्यकर्त्यांकडूनच हिंसा घडवून आणत आहेत. त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तसेच, काही राजकीय नेत्यांनीच खोड केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असेल आणि त्यातूनच या घटना घडल्या असाव्यात, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.