Curfew | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जाळपोळ आणि काही हिंसक घटना केल्यानंतर बीड (Beed Curfew) शहरामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. संचारबंदी मागे घेण्यात आली असली तरी जमावबंदी आणि इंटरनेट सुविधेवर अनिश्चित काळासाठी असलेली बंदी कायम आहे. शहरात जमावबंदी आणि संचारबंदी आदेश लागू केल्यानंतर पुढचे काही तास शहरामध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नसल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. दरम्यान, जमावबंदी कायम ठेऊन प्रशासनाने तब्बल 36 तासांनंतर संचारबंदी शिथील करत मागे घेण्याचा निर्मय घेतला. त्यामुळे बाजारपेठा आणि खासगी, सरकारी कार्यालये आजपासून सुरु राहतील. मात्र, इंटरनेट सेवा बंद असल्याने डीजिटल इंडियाशी संबंधीत काम ठप्पच राहण्याची शक्यता आहे.

बीड शहरातील संचारबंदी मागे घेण्यात आली असली तरी धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv Curfew) मात्र ती कायम असल्याचे समजते. जमावबंदी आदेशाध्ये पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यस मनाई आहे. बीड जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की, संचारबंदी शिथील करण्यात आली असली तरी, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले की, आज (1 नोव्हेंबर) सकाळी सहा वाजलेपासून संचारबंदी शिथील करण्यात आली. ज्यामुळे नागरिक घरातून बाहेर आले आहेत. रस्त्यांवर फिरत आहेत. असे असले तरी अद्यापही वाहतूक मात्र पूर्ववत झाली नाही. सार्वजनिक वाहतूकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी एसटी बस अद्यापही रस्त्यांवर धावताना दिसत नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवली असल्याचे समजते. त्याशिवाय इतर वाहनेही तुरळक प्रमाणातच रस्त्यावर धावताना दिसत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम

धाराशिव जिल्ह्यामध्ये अद्यापही संचारबंदी कायम आहे. या ठिकाणी अनेक आंदोलकांनी संचारबंदी लागू असतानाही आदेश झुगारले आणि आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. एकाच वेळी शेकडो लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी मोठ्याने घोषणा देत अनेक ठिकाणी आंदोलने केली. काहींनी रास्ता रोको, शासकीय कार्यालयांना टाळे ठोकणे, टायर जाळून महामार्ग आडवने, कँडल मार्च, साखळी उपोषण अशा प्रकारचे आंदोलन केले. त्यामुळे याठिकाणी जमावबंदी आणि संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा समाजाने धीर सोडू नये. कायदा हातात घेत हिंसाचार, जाळपोळ करु नये. अन्यथा मला निर्णय घ्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला त्यांनी शांतेत सुरु असलेले आंदोलन कायम ठेवण्याचे अवाहन केले आहे.