अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही- चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil, Ashok Chavan (Photo Credit: Facebook)

मराठा आरक्षणाबाबत अजूनही तोडगा निघत नसल्याने सर्वांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासह अनेक विषयांवर भाष्य केले. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.हेदेखील वाचा- Maratha Reservation: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त मराठे रायगडावर जमणार- मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याबाबतही चंद्रकांत पाटलांनी भाष्य केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का? ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल अॅप्रोचचा आम्ही निषेध करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता मराठा समाजातील उमेदवारांना 10 टक्के आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याचसोबत सरळ सेवा भरतीमध्ये ही मराठा समाजातील उमेदवारांना 10 टक्के ईवीएसचा ही लाभ घेता येणार आहे. या बद्दल राज्य सरकारकडून आदेश जाहीर केला आहे.