Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन
Traffic Police (PC- Facebook)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Aarakshan) एल्गार पुकारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आज मुंबईच्या वेशीवर दाखल होणार आहे. काल पिंपरी चिंचवड पार करताना स्थानिक ट्राफिक पोलिसांचे तारांबळ उडाली होती. मनोज जरांगेंसोबत लाख भर मराठे आहेत. आता हा ताफा आज नवी मुंबई मध्ये येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई ट्राफिक पोलिसांसमोरही त्यांची व्यवस्था ठेवण्याचं आव्हान आहे. दरम्यान गुरुवारी वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी मोर्चा आयोजकांनी त्यांच्या मार्गात बदल केला आहे, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक (एसपी) सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

आता मनोज जरांगेसह मुंबईकडे कूच करणार्‍यांची वाहनं NH48 - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करतील आणि शेडुंग टोल प्लाझापर्यंत पोहोचतील. सुरुवातीच्या नियोजनानुसार मोर्चा गुरुवारी सकाळी कळंबोलीत येणार नसून, गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे पोहोचेल. जरांगे आणि त्यांचे समर्थक शुक्रवारी एपीएमसी परिसरात रात्र काढतील आणि शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानाकडे मोर्चाला सुरुवात करतील.

कशी असेल आज वाहतूक व्यवस्था?

आज (25 जानेवारी) कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर करण्यास परवानगी दिली जाणार नाही. "मोर्चा एक्सप्रेस वे ऐवजी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करणार आहे. खंडाळा घाट विभागात 6 किमीचा रस्ता आहे जो दोन्ही मार्गावरील वाहने वापरतील अशी माहिती हायवे सेफ्टी पेट्रोल (एचएसपी), पुणे युनिट एसपी, लता फड यांनी सांगितले आहे. "कोल्हापूर, पुणे आणि अहमदनगर येथून येणारी अवजड वाहने एक्सप्रेस वेच्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी थांबवली जातील आणि मोर्चा खंडाळा घाट विभागातून जाईपर्यंत टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यास परवानगी दिली जाईल. एक्सप्रेस वे चा पुणे-कडे जाणारा कॉरिडॉर अवजड वाहनांसाठी खुला असेल आणि दोन्ही दिशेने हलक्या मोटार वाहनांच्या हालचालींवर कोणतेही बंधन नसेल.

एचएसपीच्या सहाय्यक निरीक्षक सुमैया बागवान यांनी सांगितले की, खंडाळ्याच्या बाहेरून मुंबई-पुणे महामार्गाकडे बॅरिकेड्स लावले जातील आणि वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.

नवी मुंबईत शुक्रवारी मध्यरात्री संपणाऱ्या 24 तासांच्या कालावधीत अवजड वाहनांना रस्त्यावर येण्यास किंवा पार्क करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे डीसीपी (वाहतूक) तिरुपती काकडे यांनी सांगितले. तसेच मुंबई, ठाणे आणि पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली सर्कल जंक्शनवरून त्यांच्या इच्छित स्थळी वळवण्यात येणार आहेत.