भारतासह जगभरात आपल्या गायनामुळे नावलौकिक मिळविलेल्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेल्या पहिल्या लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण आज झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सन्मानपूर्वक एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. मात्र या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकले नव्हते, यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर टीका केली आहे.
मंत्री म्हणतात, 'लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.'
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, 'लता दीदी आणि माझी ओळख दिवंगत सुधीर फडके यांनी करून दिली. गेल्या अनेक वर्षात मला लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्याकडून खूप स्नेह मिळाला आहे. गेले अनेक वर्षे मंगेशकर कुटुंबीय माझ्या जीवनाचा हिस्सा बनले असून यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मला त्यांची विशेष आठवण येईल. संगीताच्या या सामर्थ्याला, या शक्तीला आपण लतादीदींच्या रुपात प्रत्यक्षात पाहू शकलो, याचा माझ्यासह समस्त देशवासीयांना अभिमान वाटतो. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही असे ठरविले होते पण हा पुरस्कार माझ्या बहिणीच्या नावाने असल्याने हा पुरस्कार मी स्वीकारला असून हा पुरस्कार मी समस्त देशवासीयांना अर्पण करतो.' (हेही वाचा: पंतप्रधान मोदींना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित, वाचा काय म्हणाले ते?)
मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 80 वा स्मृती सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येत आहे. या सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.