Nagpur Murder: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला अटक
Representational Image | (Photo Credits: PTI)

महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असताना हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. नागपूर (Nagpur) येथे शाररिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीची तिच्या प्रियकराने हत्या (Murder) केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. या हत्येनंतर प्रियकराने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रियकराच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. ज्यात प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका शंकर पटेल (वय, 33) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, मोहम्मद जाविद मोहम्मद युसूफ शेख (वय, 38) असे आरोपीचे नाव आहे. सारिका आणि शेख हे दोघेही विवाहित आहेत. परंतु, सारिका गेल्या चार वर्षांपासून तिच्या नवऱ्यापासून वेगळी राहत आहे. तर, शेख आपल्या पत्नीला सोडून नागपूर येथे राहत होता. सारिका आणि शेख यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असून ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, सारिका आणि शेख यांच्यात बुधवारी (31 मार्च) रोजी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर सारिका बाहेर निघून गेली. यावर संतापलेल्या जाविदने तिला विट फेकून मारली. यामुळे ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी जाविदने आरडाओरडा करत स्थानिक लोकांना मदतीसाठी बोलावले आणि सारिका इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला. हे देखील वाचा-महाराष्ट्र राज्यात विकेंड्सला कठोर लॉकडाऊन लागू; अत्यावश्यक सेवेसह बस, ट्रेन, टॅक्सी सेवांना परवानगी- नवाब मलिक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. ज्यात शेख यानेच सारिकाची हत्या केल्याची निदर्शनास आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.