![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/09/crime-scene-pti-5-784x441-380x214.jpg)
मोबाईलमधील लूडो (Ludo) गेममध्ये वारंवार होत असलेल्या पराभवामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. एवढेच नव्हेतर बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले आहेत. ही घटना मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित राज पोपट उर्फ जिमी (वय, 34) असे आरोपीचे नाव आहे. अमित हा 17 मार्च रोजी त्याचा मित्र मृतक तुकाराम नलवडे (वय, 52) यांच्यासोबत मोबाईलवर लूडो गेम खेळत होता. दरम्यान, या गेममध्ये तुकाराम वारंवार जिंकत होता. तसेच वारंवार होत असलेल्या पराभवाच्या नैराश्यातून अमितने तुकाराम सोबत भांडायला सुरुवात केली. दरम्यान, अमितने रागाच्या भरात तुकारामला मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तुकाराम जमीनीवर कोसळला. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. महत्वाचे म्हणजे, या गुन्ह्यावर पांघरून टाकण्यासाठी अमितने बोरिवलीतील खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने 10 हजार रुपयांचे नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आणून मृतक परिवाराला दिले. त्यानंतर मालाडच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. हे देखील वाचा- Sex Racket in Mumbai: मुंबई सेक्स रॅकेट चालवणार्या 4 जणांना अटक; POCSO अंतर्गत कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हेतर, प्राणघातक हल्ल्यामुळे झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुकाराम यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर 20 मार्च रोजी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताबडतोब अटक केली आहे.