महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 21,907 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11,88,015 वर पोहोचली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 23,501 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 8,57,933 वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.
राज्यात सध्या 2,97,480 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्यामध्ये 425 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 32,216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 57,86,147 नमुन्यांपैकी 11,88,015 नमुने पॉझिटिव्ह (20.53 टक्के) आले आहेत. राज्यात 18,01,180 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 39,831 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पीटीआय ट्वीट -
Maharashtra's coronavirus tally rises to 11,88,015 with 21,907 new cases; 425 fatalities take death toll to 32,216: health department
— Press Trust of India (@PTI_News) September 19, 2020
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 2,60,000 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच 35,086 व्यक्तींना अटक करण्यात आली असून, 25,33,28,214 रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात, दुर्देवाने राज्यातील 195 पोलीस व 22 अधिकारी अशा एकूण 217 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. (हेही वाचा: महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना विषाणूची लागण; स्वतःला आयसोलेट केल्याची माहिती)
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.