Maharashtra Winter Assembly Session 2020: महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई मध्ये होणार
महाराष्ट्र विधिमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोवि़ड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session 2020) आता नागपूर (Nagpur) ऐवजी मुंबईत (Mumbai) होणार आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 7 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार होतं. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई आयोजित करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिवाळी अधिवेशन घेण्यासंदर्भात चर्चा सुरु होती. आता मात्र या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान, यासाठी मुंबईतील विधानभवनाच्या बाहेर मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी संकट कायम आहे. तसंच नागपूरमध्ये अधिक थंडी असते त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पुन्हा कोविड-19 चा संसर्ग वाढू नये यासाठी मुंबईत अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तसंच विशेष नियमांचे पालन करत हे अधिवेशन पार पडणार आहे.

 

AIR News Mumbai Tweet:

दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन देखील 2 दिवसांत आटोपण्यात आलं. यासाठी आमदार, सचिवांसह अन्य अधिकाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वर्षभरात तीन अधिवेशनं होतात. पहिलं अर्थसंकल्पयीन अधिवेशन फेब्रुवारी-मार्च मध्ये मुंबईत पार पडते. ते साधारणपणे 5 दिवसांचे असते. त्यानंतर पावसाळी अधिवेशन जून-जुलै दरम्यान मुंबईतच आयोजित केले जाते. ते 3-4 आठवड्यांपर्यंत चालते. दरम्यान, 2-3 आठवड्यांसाठी आयोजित करण्यात येणारे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नागपूर येथे घेतले जाते. परंतु. यंदा ते मुंबईत होणार आहे.

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 18,32,176 इतका झाला असून त्यापैकी 16,95,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 88,537 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण 47,357 मृतांची नोंद झाली आहे.