Maharashtra Weather Forecast: अंदमानात आज मान्सून दाखल होण्याचा अंदाज; कोल्हापूर ते लातूर या 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

सध्या मुंबई, पुणे सह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे होणारी अंगाची काहिली सामान्यांसाठी वैतागवाणी गोष्ट ठरत आहे. पण यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याची चिन्हं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 16 मे दिवशी अंदमानात (Andaman) मान्सून (Monsoon) धडकण्याची शक्यता आहे परिणामी महाराष्ट्रात आता उन्हाचा कडाका कमी होऊन जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी वारे आज अंदमान, निकोबार बेटासंह बंगलाच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सक्रिय झाल्यास पुढील 24 तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल. केरळातही पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात 7,8 जून पर्यंत मान्सून दाखल होईल तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापण्यासाठी त्याला 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. नक्की वाचा:  Monsoon 2022 Forecast: यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार; IMD ने व्यक्त केला अंदाज.

हवामान अंदाज

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 9 जिल्ह्यांना आज 16 मे पासून पुढील 3 दिवस म्हणजे 19 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण भारतामध्ये पावसाच्या आगमनाचा आनंद असला तरीही उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.