यंदाचा मान्सून परतीच्या वाटेवर असताना देखील राज्यात अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस जोरदार बरसत असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. आज हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. पावसासोबत वीजांचा कडकडाट देखील होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज 16 ऑक्टोबर दिवशी पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या भागामध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. वीजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी रहावं असं आवाहन करण्यात आले आहे.
पुणे हवामान अंदाज
मराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे जोरदार सरी नसल्या तरीही शेतकर्यांनी पिकांचं रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाच्या सरी या पुढील 5 दिवस कायम बरसत राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी दिवसा उन्हाचा प्रखर तडाखा आणि संध्याकाळी पावसाच्या दमदार सरी हजेरी लावत आहेत.