
हवामान खात्याने (Meteorological Department) याआधी एप्रिल ते जून 2025 या काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्याचा परिणाम आता दररोज दिसत आहे. उद्या 10 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेसह काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. सध्या, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात तापमान वाढले आहे. उत्तरी महाराष्ट्र आणि विदर्भातील नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरसारख्या भागात 5 ते 10 एप्रिल दरम्यान कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
दुसरीकडे, 10 एप्रिलपासून राज्यात बरेच ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे.
नांदेड, लातूर, धाराशिव या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी गडगडाटी वादळासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात सरासरी तापमान 28-34 अंश सेल्सियस असते, आणि सामान्यतः पावसाचे प्रमाण जवळजवळ शून्य असते. पण यंदा हवामानात बदल अपेक्षित आहे. (हेही वाचा: Mumbai Wate Lake Evaporation: मुंबईच्या घशाला कोरड? उन्हाचा ताप, बाष्पीभवन वाढले; पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा घटला)
मुंबईत 10 एप्रिल रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे, तर विदर्भात ते 40 अंशांपर्यंत जाऊ शकते. हवेत आर्द्रता जास्त असेल, त्यामुळे उकाडा जाणवेल. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात सुरू असलेल्या सततच्या उष्ण आणि दमट हवामानापासून मुंबईकरांना लवकरच थोडासा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले की, 10 एप्रिलपासून उष्ण आणि दमट हवामान कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र शहरात कोरडे हवामान कायम राहील. या उष्ण आणि बदलत्या हवामानात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे, आणि भरपूर पाणी प्यावे, असे सल्ले दिले जात आहेत.