महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महा विकास आघाडी यांच्यात झालेल्या थेट लढतीमध्ये कोण बाजी मारते हे आज कळणार आहे. थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 8.00 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. दरम्यान, मतदान संपल्यावर आलेल्या एक्झिट पोल्सचा कल पाहता ते सत्ताधारी महायुती पर्यायाने भाजपच्या बाजूने झुकलेले दिसतात. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटांनी आघाडी केलेल्या एमव्हीएला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. तसेच, यश याहीवेळी मिळेल असे भाकीत केवळ एका एक्झिट पोल्सने केले आहे.

सर्व 288 जागांवरील मतमोजणी

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान झाले. बहुमताचा आकडा 145 आहे आणि 11 एक्झिट पोलच्या सरासरीनुसार महायुतिला 155 जागा मिळू शकते असे भाकीत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेल्या महाविकासआघाडीला 120 जागा मिळू शकतील तर अपक्ष साधारण 13 जागांवर विजयी होऊ शकतात, असे एक्झिट पोल्सचा अंदाज आहे. अर्थात एक्झिट पोल्सचे अंदाज म्हणजे निकाल नसतो. त्यामुळे आज मतमोजणीत काय होते याबातब राज्यभरच नव्हे तर देशभर उत्सुकता आहे.

महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यात टक्कर

मतमोजणीबाबत उत्सुकता असतानाच दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी आणि महायुती यांच्यात संभाव्य संधी विचारात घेता सत्तास्थापणेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय बैठकांचे आयोजन करुन रणनिती ठरविण्यावर जोर दिला जात आहे. कालच मविआची एक बैठक हॉटेल ग्रँड हयात येथे पार पडली. त्यानंतर मविआनेते थेट मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दुसऱ्या बजूला महायुतीचीही एक बैठक सागर बंगल्यावर पार पडली.

महत्त्वाचे म्हणजे महायुती आणि महाविकासाघाडी यांच्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरुनही रस्सीखेच आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव महाविकासआघाडीकडून जोरदार चर्चेत आहे. शिवया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचाही या पदावर डोळा आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे विद्यमान मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थेट मुख्यमंत्री पदावर डोळा ठेऊन आहेत. अशा वेळी, सत्तेची किल्ली जनता कोणाला देते याबाबत उत्सुता आहे. साधारण दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.