
राज्यातील अनेक भागांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका हा बसला आहे. विदर्भात सोमवारी रात्री आणि मंगळवारी नागपूर, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोल्यात वादळी पावसासह काही भागात गारांचा तडाखा बसला. या अवकाळी पावसाने गहू, कांद्यासह आंबा व संत्रा या फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सणासुदीच्या वेळेला शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. (हेही वाचा - Weather Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान खात्याची माहिती)
ऐन उन्हाळ्यातील या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. तर आज पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातही विजांसह पावसाची शक्यता आहे. आज विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आलाय. मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकाचे अतोनात नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालाय. मंगळवारी रात्री दरम्यान वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट जोरदार अवकाळी पाऊस बरसला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खडकी बोरगाव, मोय खेडा दिगर, फतेपूर् फेक्री या गावांना मंगळवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला.