ठाणे: कल्याण येथे दोन चिमुकल्या बाळांसह 51 जण कोरोनामुक्त
A child wearing a mask to get protected from coronavirus. (Photo Credit: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या काळात घरीच थांबून कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वयोवृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी स्वत:ची काळजी घ्यावी अशा सुचना सुद्धा दिल्या आहेत. तर कोरोनाच्या रुग्णांवर संपूर्ण वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या विरोधात लढा देत लहान चिमुकल्या पासून ते 90 वर्षीय वृद्धांपर्यंत रुग्ण त्यामधून बरे झाले आहेत. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण मधील दोन चिमुकल्या बाळांसह 51 जण कोरोनामुक्त झाल्याची आनंदाची बातमी आहे.

ठाणे येथे सुद्धा दररोज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे ठाण्यात ही लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. ठाण्यात 3287 कोरोनाबाधित रुग्ण असून आतापर्यंत 36 जणांचा बळी गेला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा खरेदी करण्यासाठी फक्त घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावणे अनिवार्य असून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे ही पालन करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra Police: महाराष्ट्रातील 1,061 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; 9 जणांचा मृत्यू)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून मुंबई, पुणेसह कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउन वाढवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप सरकारकडून लॉकडाउन वाढवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यात कोरोना व्हायरसचा वेग संथ करण्यास यश आले असून त्याची अद्याप साखळी तुटलेली नसल्याचे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.